मॅनचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या टेस्ट मॅचला बुधवार 23 जुलैपासून सुरूवात होत आहे. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये आधीच 2-1 ने पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाला आव्हान कायम ठेवण्यासाठी चौथ्या टेस्टमध्ये विजय गरजेचा आहे. या सामन्यात पराभव झाला तर एक मॅच शिल्लक असतानाच टीम इंडिया सीरिजही गमावेल. करो या मरो सारखी ही मॅच असताना टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. त्यातच जसप्रीत बुमराह खेळणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने हा सस्पेन्स संपवला आहे.

जसप्रीत बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळणार असल्याचं मोहम्मद सिराजने सांगितलं आहे. वर्कलोडमुळे बुमराह 5 मॅचच्या सीरिजमध्ये 3 मॅच खेळेल हे टीम इंडियाने आधीच स्पष्ट केलं होतं. आता मॅनचेस्टरमध्ये बुधवारपासून सुरू होणारी मॅच बुमराहची सीरिजमधील तिसरी टेस्ट असेल. दुसऱ्या टेस्टमध्ये बुमराह खेळला नव्हता, त्या सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता. यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये बुमराहचं टीममध्ये पुनरागमन झालं. हा सामना भारताने 22 रननी गमावला.
