खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
चंद्रपूर : आकारणी वर्ष २०२६-२७ साठी कर ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ ऐवजी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात यावी, अशी लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, व्यावसायिक व कर सल्लागार हे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आयकर रिटर्न भरण्याच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर आयकर विभागाच्या पोर्टलमधील युटिलिटीमध्ये झालेले बदल, आर्थिक विवरणांचे जुळवणी व पडताळणी काम, तसेच जीएसटी आणि टीडीएस/टीसीएस च्या वैधानिक पूर्ततेचा वाढता ताण यामुळे ऑडिट पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी उपलब्ध झाला आहे.
या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, आयकर कायदा १९६१ च्या कलम ११९ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करत अर्थ मंत्रालयाने कर ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवावी व त्यासंबंधीची अधिसूचना त्वरित जारी करावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
