आमदार सुधाकर अडबाले यांचे पालक मेळाव्यात आवाहन
चंद्रपूर : “आजचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेतील गुण किंवा रँक मिळवण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करून यशस्वी होण्यासाठी सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना केवळ परीक्षेतच नाही, तर आयुष्यात यशस्वी बनवणे हेच खरे पालक-शिक्षकांचे ध्येय असावे.” असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बोर्डा (ता. जि. चंद्रपूर) येथे बुधवारी पार पडलेल्या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून आमदार अडबाले बोलत होते.
यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. बोनगीरवार, मुख्याध्यापक आर. टी. खवशी, गावचे उपसरपंच दीपक खनके, संतोष मेश्राम, चेतन मेश्राम, सुनील देवगडे, विद्याताई आत्राम, आत्माराम तावाडे, प्रा. रवी झाडे, प्रकाश कुमरे, प्रतिभा पेंदोर व मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. टी. खवशी यांनी केले.
यावेळी सुरुवातीला शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते मॅथ (गणित) लॅब, सायन्स (विज्ञान) लॅब, डिजिटल क्लास रूम, सायन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आमदार अडबाले पुढे म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आश्रमशाळेचा चेहरामोहरा बदलत आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना घडविण्याचे उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांना एखाद्या दुर्दैवी किंवा अपवादात्मक घटनेवरून जबाबदार धरले जाते. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते. ज्याचा अप्रत्यक्ष फटका विद्यार्थ्यांच्याच विकासाला बसतो. त्यामुळे विभागाने तात्काळ शिक्षक – कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करू नये. चौकशी करूनच पुढील कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि अभ्यास व खेळाच्या माध्यमातून आपले, आपल्या पालकांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करा, अशी आशा व्यक्त करतो.
