‘बाप्पा डॉट ऑर्ग’ वर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
चंद्रपूर, दि. 22 : महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे व्यापक दस्तऐवजीकरण करून या उत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर व्यापक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्यांचे डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.
यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ हे अधिकृत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जपल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सांस्कृतिक उपक्रम, कला सादरीकरण, नाट्यपरंपरा, खाद्यसंस्कृती, पारंपरिक प्रथा तसेच जुन्या आठवणींची छायाचित्रे आणि व्हिडिओ नोंदविता येणार आहेत. संबंधित माहिती पोर्टल अथवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हॉट्सॲप सुविधेद्वारे नोंदविता येणार आहे.
या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरातील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शासनाकडून अधिकृत डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबातील जुन्या गणेशोत्सवाच्या आठवणींपासून ते आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांपर्यंतची माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ या डिजिटल व्यासपीठावर नोंदवावेत.
‘आपल्या बाप्पाला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी योगदान द्या’
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक पिढ्यांपासून जपल्या गेलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरा, कला, संस्कृती आणि आठवणींचे दस्तऐवजीकरण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक, कुटुंबे, सार्वजनिक गणेश मंडळे, कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच आपल्या बाप्पाला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी बहुमूल्य योगदान द्यावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
00000
