चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील भिसी येथे ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या नावाखाली 27 वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी भोंदू महाराज शुभम खंगार याच्यासह त्याला मदत करणारे सचिन मोडक आणि तेजस वालकटे अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पतीची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पूजेसाठी शुभम महाराजांशी संपर्क साधला होता. रविवारी मध्यरात्री पीडितेच्या घरी पूजा सुरू असताना आरोपींनी तिच्या पतीला पूजेचे साहित्य आणण्यासाठी बाहेर पाठवले. त्यानंतर विवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आणि भिसी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करत आहेत.
