देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी सर्व सामान्य नागरिक यांना महागाईच्या खाईत लोटून महाराष्ट्र राज्याची अस्मिता गहाण ठेवणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला या लुटारू सरकारला येणाऱ्या निवडणुकीत आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धडा शिकवा असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी केले.
घुग्गुस येथे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम प्रचार दिनी आज शहरातील विविध प्रभागात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित सभेस काँग्रेसचे प्रवीण पडवेकर, नंदू नागरकर, कामगार नेते के.के.सिंग जुनैद खाँन, मतीन कुरेशी, रवी भिसे, शालिनी भगत, राजेश अडूर, कुणाल चहारे, रमिज शेख, जावेद शेख यांचेसह चंद्रपूर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, घुग्गुस शहराध्यक्ष राजू रेड्डी,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दीप्ती सोनटक्के, यांचेसह नगरसेवक पदाकरिता उभे असलेले सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप मध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचे कार्य जोमात सुरू आहे.
चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार व राजुरा आमदार देवराव भोंगळे आतून पाडापाडीचे राजकारणात गुंतले असून काँग्रेसला सर्व प्रभागातून मिळत असलेला प्रतिसाद बघून धास्तावले आहे. घुग्गुस शहरातील जनतेकडे सत्ताधाऱ्यांनी पाठ फिरवून प्रदूषणाच्या खाईत लोटले.तर दुसरीकडे स्थानिक बेरोजगारांना रोजगारापासून दूर करण्याचे पाप हे निष्ठुर सरकार करत आहे. येथील मी पालकमंत्री असताना घुग्गुस शहराला नगरपरिषदेचा दर्जा दिला.
लोकांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेऊन येथील बंदवस्थेतील रुग्णालय कार्यान्वीत केले. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी या रुग्णालयाला साहित्य देखील पुरविले नाही. येथील नागरिकांना स्थायी पट्टेअजूनही देण्यात आले नाही. तर ग्राम पंचायत काळात कोट्यावधींचा भ्रष्टाचार करून सत्ताधारी भाजपने घुग्गुस शहराची पूर्णतः वाट लावली. व विकास कामांच्या कंत्राटातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला.सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेल्या या हेकेखोर व लुटारू निर्दयी सरकारला धडा शिकविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजय करा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. याप्रसंगी घुग्गुस शहरातील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
