क्रिकेट बुकींच्या अंतर्गत वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात न्यायालयासमोर झालेल्या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा झालाय. आज संध्याकाळी राजुरा शहरातील न्यायालयासमोर मुख्य मार्गावर विनोद जाधव नामक युवकाची दोघांनी जवळून गोळ्या झाडून हत्या केली. मयत एका नारळ पाणी विक्रीच्या दुकानात बसला असताना चेहरा झाकलेल्या 2 दुचाकीस्वारांनी तिथे पोचत देशी कट्ट्यातून 3 गोळ्या झाडल्या. आरोपी लगेच घटनास्थळावरून फरार झाले. मात्र दोन्ही आरोपीनी स्वतः ठाण्यात पोचून आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. क्रिकेट बुकींच्या अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती असून आरोपी करन बावसकर ( 22) आणि करन मेकलवार ( 23) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली जात आहे. दरम्यान राजुरा शहरात टोळीयुद्ध आणि अवैध कोळसा व्यापारा संदर्भात नजीकच्या काळातील ही गोळीबाराची तिसरी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजुरा गाठत परिस्थितीची पाहणी केली. राजुरा पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या एका महिन्यात चंद्रपूर पोलिसांनी जिल्हाभर अवैध शस्त्रे आणि काडतुसे याबाबत राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या संख्येत शस्त्रांची जप्ती झाली असून या एकूण प्रकाराने चंद्रपूरकर हादरले आहेत.
