चुनाभट्टी आणि विसापूरच्या प्रेमाचे ऋण विकासातून फेडणार; आ. सुधीर मुनगंटीवार यांची भावनिक ग्वाही

वाढदिवसानिमित्त सत्कार, अभिष्टचिंतन व शालेय साहित्य वाटप; सभागृह, सी.सी. रस्ता आणि जिम उभारण्याची आ.मुनगंटीवार यांची घोषणा

चुनाभट्टी आणि विसापूरवासियांनी दिलेले प्रेम आयुष्यभर विसरणार नाही’; शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रातील विकासकामांचा आढावा

चंद्रपूर, दि. ५ : “चुनाभट्टी आणि विसापूरच्या जनतेने मला नेहमीच निस्सीम प्रेम, विश्वास आणि आपुलकी दिली. हे प्रेमच माझ्या सार्वजनिक जीवनाची खरी ताकद असून, या प्रेमाचे ऋण मी गावाच्या सर्वांगीण विकासातून फेडत राहीन,” अशी ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. चुनाभट्टी, ता. बल्लारपूर येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ, अभिष्टचिंतन सोहळा आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी चुनाभट्टी येथील भगवान श्रीकृष्ण मंदिरासमोर सभागृह उभारणे, गावाकडे येणारा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करणे आणि तरुणांच्या मागणीनुसार अत्याधुनिक जिम उभारणे, या महत्त्वपूर्ण घोषणा करत परिसराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आ. मुनगंटीवार यांचे उत्स्फूर्त स्वागत करत वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सन १९८८ मध्ये प्रथमच चुनाभट्टी येथे येण्याचा योग आला. त्या दिवसापासून या गावाशी निर्माण झालेले जिव्हाळ्याचे नाते आजही तितकेच दृढ आहे. चुनाभट्टी, येथील जनता आणि परिसर माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण असून, येथील कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी प्रेमाचा वर्षाव केला आहे. जनतेने दाखविलेला विश्वास हेच माझ्या कामाची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.

चुनाभट्टी आणि विसापूर परिसरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेताना आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या मागणीनुसार पाण्याची टाकी, अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत इमारत, सामाजिक सभागृह आदी सुविधा उभारण्यात आल्या. विसापूरमध्ये पहिल्याच कार्यकाळात सिमेंट रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले. प्रभाग संघासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. आता या विकास प्रवासात आणखी भर घालत चुनाभट्टी येथे सभागृह, सी.सी. रस्ता आणि जिम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकेकाळी चुनाभट्टी परिसरात विकासाची कोणतीही ठळक चिन्हे नव्हती. मात्र आज हा परिसर शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या दृष्टीने नवे केंद्र बनत असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. चुनाभट्टीलगत अत्याधुनिक सैनिक शाळा उभी राहत असून, विसापूर येथे ५० एकर जागेवर एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र साकारले जात आहे. या विद्यापीठामध्ये सुमारे पाच हजार मुलींना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, या प्रकल्पाचे उद्घाटन देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली.

परिसरातील औद्योगिक आणि आर्थिक विकासावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, बल्लारपूर शहराला पेपर मिलमुळे औद्योगिक ओळख मिळाली. आता विसापूर पॉवर हाऊसच्या जागेवर एसआरपीएफचे केंद्र उभे राहत असून, त्यामुळे या भागात नव्या आर्थिक घडामोडींना चालना मिळणार आहे. यामुळे रोजगाराच्या संधी वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

आरोग्य क्षेत्रातील विकासकामांचा उल्लेख करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, मेडिकल कॉलेज, पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल, उमरी पोतदार, मानोरा आणि कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारती, मुल ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर, डायलिसिस सेंटर, बल्लारपूर रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन तसेच विसापूर-चुनाभट्टी-भिवकुंड परिसरातील नागरिकांसाठी पाच एकर जागेवर ईएसआयसी रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. या सुविधांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणाईच्या भवितव्यावर बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन शौर्यच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केल्याचा अभिमान व्यक्त केला. मिशन ऑलिम्पिक २०३६ च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण जागतिक स्तरावर पदक जिंकतील, असा विश्वास व्यक्त करत क्रीडा क्षेत्रासाठी उभारण्यात आलेल्या स्टेडियमसह धनुर्विद्या केंद्रासाठी ८.५० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चुनाभट्टी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. सिमरन नाग, पूनम नाग, माही आत्राम, कृतिका राठोड, अनुराधा तिवारी, साक्षी यादव, मानवी नैताम आणि वनराज मडावी या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. तसेच नागरिकांना छत्र्यांचेही वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, किशोर पंदीलवार, पिंटू देऊळकर, रमेश पिपरे, अशोक थेरे, संदीप पोडे, श्रीमती विद्याताई देवाडकर, भारत जीवणे, गणेश टोंगे, अंजलीताई पंदीलवार, सुरेखाताई ईटणकर, रमेश लिंगमपल्लीवार, विद्याताई गेडाम, सविताताई डाहूले, शशिकलाताई जीवणे, अशोक देशमुख यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *