त्याला मदत करणारा आणखी एक साथीदार गजाआड, एकूण 3 आरोपी अटकेत आल्यावर तपास झाला वेगवान
– चंद्रपूर पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या बनावट पदवी -गुणपत्रिका रॅकेट मधील मुख्य सूत्रधार परिमल गौरकार याला अटक करण्यात आली आहे. त्याला मदत करणारा आणखी एक साथीदार गजाआड झालाय. एकूण 3 आरोपी अटकेत आल्यावर आता तपास वेगवान झालाय. देशभरात पेपरफुटीच्या घटनांनी शिक्षण आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच चंद्रपुरात शिक्षण व्यवस्थेलाच हादरविणारे रॅकेट उघडकीस आले. लाखो रुपये मोजल्यास नामांकित विद्यापीठांच्या पदव्या, गुणपत्रिका, डिप्लोमा आणि मायग्रेशन प्रमाणपत्रे तयार करून देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
विशेष म्हणजे, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार परिमल हा उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैभव सोनुले (रा. चंद्रपूर) या एका युवकाला आधीच अटक केली आहे. आता परिमल याला मदत करणाऱ्या अक्षय खोब्रागडे यालाही अटक करण्यात आली आहे. चंद्रपुरातील तुकूम परिसरातील एसटी वर्कशॉप चौकात राहणाऱ्या परिमलने स्थानिक शेजा-याकडे जानेवारी महिन्यात एक कापडी पिशवी ठेवण्यास दिली होती. अनेक महिने ही कापडी परत घेण्यास परिमल आलाच नाही. शेजा-याने कुतूहलाने कापडी पिशवी उघडल्यावर धक्का बसला.
यात विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या-प्रमाणपत्र आढळून आली. विचारणा केल्यावर बनावट प्रमाणपत्र 5-10 लाखात विकण्याचे काम आपण करत असल्याचे त्याने फोनवर सांगितले. पिशवी बाळगून असलेल्या शेजा-याने तातडीने दुर्गापूर पोलिसांशी संपर्क साधून सर्व कागदपत्रे पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी कागदपत्रे जप्त करून त्यांची सत्यता तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी पदव्या- प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणात गुन्हा दाखल करून आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आता ही बनावट पदवी आणि प्रमाणपत्रे त्या- त्या विद्यापीठांकडे तपासणीसाठी पाठवली असून ती त्यांचीच आहेत का याबाबत सत्यता पडताळून पाहिली जात आहे. या प्रकरणात रॅकेट मधील आणखी काही इसम ताब्यात येण्याची शक्यता आहे.
