विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर प्रकरण उघड, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, बल्लारपूर तालुक्यातील अनुदानित खाजगी आश्रमशाळेतील प्रकार
चंद्रपूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाचव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच अन्य दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर प्रकरण उघड झाले. पोलीसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील एका खाजगी अनुदानित आश्रमशाळेतील घडलाय. आरोपींचे वय सुमारे १० ते ११ वर्षे आहे. पीडित विद्यार्थी हे सख्खे भाऊ आहेत. पीडित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे केवळ आश्रमशाळा आणि तिथल्या वसतिगृहाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले नसून, एवढ्या लहान वयातील मुलांमध्ये अशी विकृत मानसिकता कशी निर्माण होत आहे, याबाबतही गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
या आश्रमशाळेत मुला-मुलींच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. मुलांच्या एका खोलीत सुमारे १२ ते १५ विद्यार्थी राहत असून, पीडित आणि आरोपी विद्यार्थी एकाच खोलीत राहत होते. घटनेमागील नेमकी कारणे तसेच वसतिगृहातील सुरक्षा आणि व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान आरोपी विद्यार्थ्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आतापर्यंत वसतिगृहातील सुमारे 35 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून, इतर विद्यार्थ्यांचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही; मात्र त्यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल आणि इंटरनेटचा अनियंत्रित वापर, अश्लील कंटेंटपर्यंत सहज पोहोच, मुलांशी संवादाचा अभाव तसेच लैंगिक सुरक्षिततेबाबत योग्य शिक्षणाचा अभाव ही अशा घटनांमागील संभाव्य कारणे मानली जात आहेत.
