चंद्रपूर शहर मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर आणि नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप- झाला संघर्ष

भाजपचेच नगरसेवक म्हणाले सभेत नव्हता कोरम, तर महापौर म्हणाल्या, विषय मंजूर- सभा तहकूब

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी पुन्हा एकदा मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा मुद्दा अजेंड्यावर आला नसल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर महापौरांविरोधात जोरदार निदर्शने केली. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी सभेवर काही काळ बहिष्कार टाकत कोरम पूर्ण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, काँग्रेसमधील वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी ऐनवेळी सभागृहात उपस्थित राहत भाजपमधील आमदार मुनगंटीवार गटाच्या महापौरांना साथ दिली. त्यामुळे आवश्यक २२ सदस्यांचा कोरम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र सभागृहात सुरू असलेल्या या घडामोडींची माहिती मिळताच भाजपमधील आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवक तसेच काँग्रेसमधील खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक तातडीने सभागृहात दाखल झाले. त्यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ उडाला. या गोंधळात प्रत्यक्षात कोरम पूर्ण झाला की नाही, यावरूनच दोन्ही बाजूंकडून तीव्र वाद निर्माण झाला. काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण घडामोडीनंतर भाजपमधीलच महापौर आणि त्यांच्यात पक्षातील काही नगरसेवकांमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, नेमकी सभा वैधरीत्या पार पडली की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला असून आता प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *