कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी

आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी पंत
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026
चंद्रपूर, दि. 23 : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ चा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतक-यांना मिळणार आहे. लाभ मिळण्यासाठी काही आवश्यक अटी व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी व इतर आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
सदर योजनेअंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 43,816 शेतकरी यासाठी पात्र आहेत. सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी ‘अॅग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी व प्रमाणीकरण करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते एकमेकांशी लिंक नाहीत, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे.
यासोबतच, वरील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधावा. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी विलंब न करता आवश्यक बाबी पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *