चंद्रपूर शहरात वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पेपरफुटी प्रकरण तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. स्थानिक रामनगर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी गिऱ्हे, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. तसेच वाढत्या महागाईचा निषेध म्हणून रस्त्यावर चूल पेटवून भाकरी बनवत अनोखे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
