चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीतील जटपुरा प्रभाग क्रमांक 7 ठरलाय लक्षवेधी, या प्रभागातील सर्वसाधारण गटात राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत उभे

राज्यात महायुती कायम असताना या जागी मात्र एकमेकांविरोधात केला जातोय प्रचार, तीनही उमेदवारानी केले आहेत विजयाचे दावे

चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीतील जटपुरा प्रभाग क्रमांक 7 लक्षवेधी ठरला आहे. या प्रभागातील सर्वसाधारण गटात राज्यातील तीनही सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत. राज्यात महायुती गुण्यागोविंदाने नांदत असताना या एका जागेवर मात्र एकमेकांविरोधात प्रचार केला जातोय. भाजपने या भागात आतापर्यंत दोन मोठ्या सभा दिल्या आहेत.

शिवसेना शिंदे गटाकडून भाजपचे माजी नगरसेवक- माजी स्थायी समिती सभापती व आता शिंदे सेनेत पोहोचलेले रवी आसवानी यांची उमेदवारी आहे. ते आपल्या मागील काही वर्षातील विकास कामांच्या बळावर मतं मागत आहेत। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने रवी लोणकर या आपल्या कार्यकर्त्यावर विश्वास दर्शवत त्यांना उमेदवारी दिली आहे. राज्य व देशात असलेले भाजपचे काम व चेहरा यामुळे आपलाच विजय निश्चित आहे अशी आशा त्यांना आहे.

दरम्यान अजित पवार गटातर्फे काँग्रेस पक्षातून आलेले देवेंद्र बेले यांना तिकीट मिळाले आहे. मावळत्या मनपा ते स्वीकृत सदस्य होते. आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर त्यांनीही विजयाची आस ठेवली आहे. राज्यातील महायुती धडाक्यात प्रचार करत असताना प्रभागातील या जागेवर मात्र एकमेकांविरोधात प्रचार केला जात असल्याने मतदारही बुचकळ्यात पडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *