चंद्रपूर जिल्ह्यात मिरची ने आणला शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा, यंदा मिरचीचे बंपर उत्पादन झाल्याने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची मोठी आवक

चंद्रपूर जिल्ह्यात लाल सुक्या मिरची ने शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा आणलाय. यंदा मिरचीचे बंपर उत्पादन झाल्याने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची मोठी आवक बघायला मिळत आहे. महिनाभर आधी पहिल्या टप्प्यात 29 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर आता भाव खाली आला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात मिरचीची या हंगामात चंद्रपूर बाजारात आवक झाली आहे. मिरचीने हात दिल्याने शेतकरी सुखावला आहे.

चंद्रपूर जिल्हा धान- कापूस -सोयाबीन यासाठी ओळखला जातो. मात्र रब्बी हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. राजुरा उपविभागात व वरोरा- भद्रावती या भागात उत्तम मिरची पीक घेतले जाते. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यात मिरचीचे बंपर उत्पादन होत आहे. सुकी लाल मिरची याआधी नागपूर अथवा मध्यप्रदेशच्या बाजारपेठेत विक्रीस न्यावी लागत होती. तिला भाव देखील कमी मिळत होता.

याशिवाय वाहतूक व निवास याचा खर्च वजा करता हा तोट्याचा सौदा ठरत होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिरची मार्केटमध्ये पाऊल टाकले. मिरची व्यापार तेजीत असून दिल्ली -राजस्थान -मध्य प्रदेश -आंध्र प्रदेश -तेलंगणा या राज्यातून मिरची व्यापारी चंद्रपुरात दाखल होत आहेत. बाजार समितीने शनिवार हा दिवस मिरची लिलावासाठी निश्चित केला असून शेतकरी आपला माल या बाजारात आणत आहेत. व्यापारीवर्गाचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *