चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून चितळ स्थलांतर यशस्वीरित्या सुरू झाले आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशी १० चितळांचे सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले. या अभियानात ताडोबामध्ये चितळांना सुरक्षितपणे पकडण्यात आले आणि आफ्रिकन शैलीतील ‘बोमा’ संरचनेत ठेवण्यात आले. कोलारा टेकड्याच्या जामनी कुरण क्षेत्रात या बोमा संरचना तयार करण्यात आल्या. तेथूनच या चितळाना विशेष डिझाइन केलेल्या वाहनांमधून नेण्यात आले.
या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फॉगर आणि दुखापती टाळण्यासाठी कुशनिंग होते. वाहनातून नर-माद्यांना वेगळे नेले गेले. या उपक्रमासाठी अशी दोन वाहने खास खरेदी करण्यात आली आणि त्यात बदल करण्यात आले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सॉफ्ट-रिलीज एन्क्लोजरमध्ये प्राण्यांना यशस्वीरित्या नेण्यात आले. ताडोबाच्या कोअर डिव्हिजनचे उपसंचालक आनंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे यश मिळविले.
यात सहाय्य करणाऱ्या मध्य प्रदेशातील तज्ज्ञ पथकात डॉ. बलवंत केशवाल, व त्यांच्या वनाधिका-यांचा समावेश होता. या ऑपरेशनचे सर्वात महत्त्वाचे यश म्हणजे कोणत्याही मृत्यु आणि दुखपतीशिवाय स्थानांतरण साध्य करण्यात आले. या स्थलांतरामुळे शाकाहारी प्राण्यांचे स्थलांतर करण्यात ताडोबा टीमचा अनुभव आणखी वाढला आहे.

