राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागले असून, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. प्रलंबित असलेल्या डीजी लोन योजनेस शासनाने तब्बल १७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याने हजारो पोलीस कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत निधीस मंजुरी दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरकुलाच्या प्रश्नासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेसह शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित विभाग, गृह विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत त्यांनी पोलिसांच्या न्याय्य मागणीला गती मिळवून दिली. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःचे सुरक्षित घर मिळावे, यासाठी घेतलेल्या त्यांच्या संवेदनशील भूमिकेचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
