चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांना घातक canine distemper virus ची लागण होऊ नये यासाठी ताडोबा परिघाच्या गावांमधील भटके आणि पाळीव कुत्रे यांचे सार्वत्रिक लसीकरण केले जात आहे. काही दिवसांपूर्वी लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात या वायरसमुळे 5 वाघांचा मृत्यू झालाय. या मृत्यूंसाठी त्या भागातील रेबीज बाधित भटक्या कुत्री कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सतर्क होत सर्व राज्यांच्या वनखात्याला याबाबत निर्देश दिले.
राज्याच्या प्रधान वन्यजीव रक्षकांनी व्याघ्र प्रकल्पांच्या सभोवताल असलेल्या गावातील भटकी आणि पाळीव कुत्री यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले. हा वायरस बछड्यांसाठी घातक आहे. यामुळे ताडोबा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अगदी कनिष्ठ वन कर्मचारी आणि ग्राउंड स्टाफ यांना रोग ग्रस्त कुत्र्याची लक्षणे आणि करायवाच्या उपाययोजनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वायरसचा प्रकल्पात शिरकाव होऊ नये यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

