चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा परिघात होणार मचाणावरून प्राणीगणना, बुद्ध पौर्णिमेच्या रात्री हौशी- अनुभवी प्रगणक घेणार निसर्गानुभव

बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच एक मे रोजी मचाणवरून प्राणीगणना केली जाणार आहे. याला निसर्गानुभव असे नाव देण्यात आले असून, रात्रभर मचाणवर बसून हौशी आणि अनुभवी प्रगणकांना प्राण्यांची गणना करायची आहे. यासाठी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण सिद्ध करण्यात आल्या असून, एका मचाणावर दोन प्रगणक बसू शकतील. तर कोअर म्हणजे गाभा क्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीवर्ग प्राणीगणना करणार आहे.

ज्या 57 मचाण वन्यप्रेमींसाठी आरक्षित आहेत, त्याची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने आधीच झाली असून, त्यासाठी साडेतीन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. या गणनेतून जी आकडेवारी समोर येते, तिला शास्त्रीय मान्यता नसली, तरी कोणत्या प्राण्यांचे वास्तव्य कोणत्या भागात आहे, ढोबळमानाने सिद्ध होते. यादृष्टीने ही गणना महत्त्वाची आहे. एक मे रोजी दुपारी चार वाजता मचाणवर चढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता खाली उतरायचे आहे. त्यामुळे ज्यांना या कवायतीचा पूर्वानुभव असतो, असेच प्राणीमित्र या मोहिमेत सहभागी होतात. या काळात ताडोबा व्यवस्थापन रात्री पाण्याची व्यवस्था सांभाळते. जेवण आणि इतर साहित्य प्रगणकांना स्वतः न्यावे लागते. बुद्ध पौर्णिमेचा चंद्र तेजोमय असल्याने त्यात जंगलाचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेणे, ही पर्वणी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *