चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या कोठारी शिवारात जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अरुण मारुती पारेलवार -56 असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर सध्या चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या शिवारात ही जमीन पारेलवार यांची वडीलोपार्जित जमीन आहे. जमिनीत कापूस वेचणीचे काम सुरू असताना खरेदीदार हे पोलिसांचा ताफा व महसूल अधिकाऱ्यांच्या सह शिवारात दाखल झाले. त्यांनी थेट पिकावर जेसीबी चालविला. मात्र ही जमीन विक्री झाल्याची माहिती शेतकऱ्याला कोणीही दिली नाही. जमिनीचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी जमिनीचा ताबा खरेदीदाराला देण्यासाठी मदत कशी दिली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यासंबंधी महसूल विभाग अधिक कारवाई करत आहे.
