चंद्रपूर शहरात एकमेव शिल्लक राहिलेल्या रामाळा तलावात माशांचा मृत्यू होत आहे. या मृत माशांमुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याच परिसरात हजारो चंद्रपूरकर सकाळ -संध्याकाळ फिरण्यासाठी येतात.
गेली काही वर्षे रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या संदर्भात विविध प्रकल्प सुरू आहेत. यात संरक्षक भिंतीसह मलनिस्सारण प्रकल्प देखील महत्त्वाचा आहे.
या तलावात दोन बाजूंनी येणारे रोजचे हजारो लिटर सांडपाणी तलावातील प्राणवायू संपवण्यास कारणीभूत ठरले आहेत. यावर उपाययोजना असलेली कामे मात्र आराखड्यानुसार होत नसल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. शहरातील एकमेव शिल्लक राहिलेल्या गोंडकालीन रामाळा तलावाला वाचविण्यासाठी काटेकोर उपाय योजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त होत आहे.
