गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले भव्य रक्तदान शिबिर

मागील वर्षीच्या 501 रक्तदाता आकड्याला मागे टाकून यंदा 777 जणांनी केले रक्तदान

 गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जपत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची सीएसआर शाखा ‘लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन’ने कोनसरी आणि सुरजागड येथे शुक्रवारी घेतलेल्या भव्य रक्तदान शिबिरात शेकडो नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी तब्बल 777 जणांचे प्रत्यक्ष रक्तदान झाले. विशेष म्हणजे सर्वप्रथम लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी स्वत: रक्तदान करत कर्मचाऱ्यांसाठी आदर्श घालून दिला. मागील वर्षीच्या शिबिरात 501 जणांनी रक्तदान केले होते.

या शिबिरात उत्साह आणि एकात्मतेचे वातावरण होते. सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत रक्तदानात सहभाग नोंदवला आणि रक्तदानाला मानवतेची सेवा म्हणून स्वीकारले. मोठ्या संख्येतील सहभागातून कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि समाजासाठी योगदान देण्याची कंपनीची संस्कृती स्पष्ट झाली.

या प्रसंगी बोलताना प्रभाकरन यांनी उपक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे जीव वाचवण्यास मदत होते आणि समाजातील नातेसंबंध अधिक मजबूत होतात. “या उदात्त कार्यात सहभागी होणे मला अत्यंत समाधान देते. रक्तदान हा साधा उपक्रम असला तरी तो एखाद्याचे जीवन वाचवू शकतो. मी सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हावे,” असे ते म्हणाले.

अशा मानवतावादी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतल्यास दीर्घकालीन सकारात्मक परिणाम साधता येतो आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यात मदत होते, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केल्याने कर्मचाऱ्यांवर प्रभाव पडला आणि शेकडो कर्मचारी रक्तदानासाठी सरसावले.

भव्य प्रमाणात झालेल्या या रक्तदान शिबिराचे यश लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा कंपनीचा मानस असून, सहानुभूती, जबाबदारी आणि सक्रिय सामाजिक सहभाग यांना प्रोत्साहन देण्यावर भर राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *