—विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते,आमदार विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त २६ गावांतील वाचनालयांना ३९ लाखांच्या पुस्तकांचे वितरण
“समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल तर त्याची सुरुवात पुस्तकांपासून झाली पाहिजे. विचारांची क्रांती ही वाचनातूनच घडते. त्यामुळे ब्रम्हपुरी मतदारसंघातील प्रत्येक गावात सुसज्ज सार्वजनिक वाचनालय उभे करण्याचा माझा संकल्प आहे,” असे प्रतिपादन विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक आमदार विकास निधीतून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील २६ गावांतील सार्वजनिक वाचनालयांना तब्बल ३९ लाख रुपयांच्या निधीतून स्पर्धा परीक्षा व विविध साहित्यिक पुस्तके मंजूर करून त्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, माजी प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगराध्यक्ष योगेश मिसार, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ. नितीन ऊराडे, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तसेच विविध गावांतील वाचनालय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्या मंत्राची अंमलबजावणी करण्यासाठी गावोगावी ज्ञानाची केंद्रे उभी राहणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत, त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील हेतू आहे.”
ते पुढे म्हणाले, “महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील वंचित, शोषित आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या जयंतीचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी मी विधीमंडळात करणार आहे.” तसेच, “गावात वाचनालय असेल तर युवकांचे भविष्य उज्ज्वल होते, विद्यार्थ्यांना दिशा मिळते आणि समाजात सकारात्मक विचारांची पेरणी होते. म्हणूनच पुढील काळात मतदारसंघातील प्रत्येक गावात आधुनिक वाचनालय निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना माजी प्राचार्य डाॅ.कोकोडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निधी अत्यंत उपयुक्त ठरणार असून अनेक युवकांना याचा थेट लाभ होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश मतदारसंघभर पोहोचला असून गावोगावी वाचन संस्कृती रुजण्यास नवी चालना मिळणार आहे असे म्हणाले.
तर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुस्तक वितरण कार्यक्रम ठेवण्यात आला ही या महापुरुषांना खरी आदरांजली आहे असे मार्गदर्शन डॉ.राजेश कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी तर प्रास्ताविक ग्रंथालय अधिकारी यांनी केले.
