चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या टेकाडी शेतशिवारात बिबट्याने पोल्ट्रीफार्ममध्ये शिरून हल्ला चढवला. या हल्ल्यात तब्बल १३५ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. यात अंदाजे ६५ हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार पोल्ट्रीफार्म चालकाने वन विभागाकडे केली आहे. हल्ल्यानंतर बिबट बराच वेळ पोल्ट्रीफार्ममध्येच दडून बसला होता. मात्र, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडताच तो जंगलात पसार झाला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सुनील गेडाम यांनी दोन वर्षापूर्वी स्वतःच्या शेतात पोल्ट्रीफार्म सुरू केला. येथे सुमारे ६०० कोंबड्या व दुसऱ्या खोलीत आठ बकऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे गेडाम यांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता, १३५ कोंबड्या रक्तबंबाळ अवस्थेत मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या.
पोल्ट्रीफार्मच्या एका कोपऱ्यात बिबट दहून बसलेला पाहून त्यांनी तत्काळ दरवाजा बंद करून सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद दुर्वे यांना माहिती दिली. काही वेळातच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोल्ट्रीफार्मचा दरवाजा उघडताच बिबट जंगलात पसार झाला.
