चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेने आणखी एका बिबट्याला जखमी केले आहे. या महामार्गावर भरगाव वेगातील वाहनांच्या धडकेत वन्यजीवांच्या जखमी वा मृत होण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. घनदाट जंगलाचा परिसर असलेल्या या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे वन्यजीव उपशमन योजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी दाखल झाले. घनदाट जंगलाच्या परिसरातल्या या राष्ट्रीय महामार्गावर जखमी अवस्थेतील बिबट्याला तज्ञांच्या उपस्थितीत बेशुद्धीचे इंजेक्शन मारून त्याला निपचित करण्यात आले. या बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात रवाना करण्यात आले आहे. वन्यजीवप्रेमीनी या मार्गावर वन्यजीव अपघात टाळण्यासाठी निश्चित केलेल्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी रेटली आहे.
