चंद्रपूर येथील दालमिया सिमेंट कारखाना अपघात,जखमींना भरघोस मदत द्यावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करा – विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

चंद्रपूर येथील दालमिया सिमेंट कारखान्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेतं या घटनेनंतर प्रशासकीय अनास्था आणि कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगारांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

चंद्रपूर सिमेंट कंपनीत झालेल्या अपघात दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.नागपूर प्रमाणे त्यांनाही ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी. केवळ आश्वासने न देता ठोस मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.

या अपघाताची चौकशी करण्यासाठी सरकारने तात्काळ ‘उच्चस्तरीय चौकशी समिती’ नेमली आहे का? कारखान्यातील त्रुटींकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि व्यवस्थापनावर जरब बसणे आवश्यक आहे. प्राथमिक चौकशीत सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यास, केवळ कर्मचाऱ्यांवर नव्हे तर कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
धोकादायक रसायने आणि यंत्रसामग्री हाताळणाऱ्या उद्योगांची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरावर एक ‘विशेष पथक’ तैनात करावे, जेणेकरून भविष्यातील दुर्घटना टाळता येतील.कारखान्यात सुरक्षा अधिकारी नियुक्त होता का? असल्यास, त्याने कर्तव्यात कसूर का केली? याची सखोल चौकशी व्हावी, असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरताना विचारले की, नागपूर जिल्ह्यातील अपघातांना मिळणारा न्याय चंद्रपूरला का मिळत नाही? चंद्रपूरची जमीन, पाणी, दगड आणि कष्टकरी कामगारांचा वापर करून कंपन्या नफा कमवत आहेत, मात्र कामगारांच्या जिवाची किंमत शून्य मानली जात आहे. या कामगारांचा वाली कोण? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रश्नावर मंत्र्यांनी कामगारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले..तसेच चंद्रपूर इथे या संदर्भात बैठक घेण्यात येईल. कामगार कायद्यात आवश्यक बदल सुचवण्यासाठी आमदारांची एक समिती गठीत केली जाईल या उत्तर मंत्र्यांनी विधानसभेत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *