शरद पवारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट:सहयोग सोसायटीत पवार कुटुंब एकत्रित, लाडक्या पुतण्याच्या प्रतिमेला काकांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटी येथे जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच भेट असणार आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच या भेटीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

शरद पवार सहयोग सोसायटी येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेसमोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. सुरक्षा रक्षकाच्या हाताला हात धरुन शरद पवार पुढे आले. त्यानंतर, अजित पवारांच्या प्रतिमेसमोर डोकं खाली करुन हात जोडले. आपल्या लाडक्या पुतण्याला काकांकडून श्रद्धांजली वाहताना संपूर्ण पवार कुटुंबीय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी हीच सहयोग सोसायटी राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले होते. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक बदल झाले. यावेळी सहयोग सोसायटी, गोविंदबाग आणि मुंबईतील देवगिरी बंगला येथील घडामोडी अत्यंत वेगाने घडल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *