हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा!

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केवळ 3-4 दिवसांचे अधिवेशन व्हायचे असे सांगत त्यांची मागणी टोलवून लावली.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अल्प अधिवेशनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे एकत्रिकरण झाल्यानंतर नागपुरात किमान 2 महिन्यांचे अधिवेशन व्हावे असे निश्चित करण्यात आले. आमचे मित्र विरोधी पक्षात असताना एक महिना अधिवेशन चालायचे. ठीक आहे. पण आज सरकार घाईघाईने पुरवणी मागण्या मांडत आहे. सरकारला एवढी घाई का आहे? असे ते म्हणाले.

पटोलेंनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनीही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भाचे असल्याने ते विदर्भ करारानुसार व्हावे अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यावर तुम्ही निर्णय देणार, हे ठीक आहे. पण तुम्ही असा संदेश पाठवला की, आम्ही तिथे या गोष्टींना परवानगी दिली होती. आम्ही तिथे आमचे मत मांडले होते. आम्ही 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशन व्हावे असा आग्रह धरला होता.

अधिवेशनाचा कालावधी एखाद्या आठवड्याने वाढवण्याची आमची मागणी होती. निर्णय झाला ठीक आहे, पण तुम्ही आमच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण करू नका, असे भास्कर जाधव म्हणाले.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांच्या मागणीला उत्तर दिले. ते म्हणाले, नाना पटोले यापूर्वी पीठासीन अधिकारी होते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण पुरवणी मागण्या सादर करतो, जी विधेयके पारित करायची आहेत त्याची ओळख पहिल्या दिवशी करून दिली जाते हे त्यांना ठावूक असावे. विशेषतः अध्यादेश पहिल्या दिवशी दाखवण्याचा नियम आहे. मागील 25-30 वर्षांतील अधिवेशनांच्या पहिल्या दिवसाची माहिती काढली तर यापेक्षा वेगळा अजेंडा दिसणार नाही. अधिवेशन अधिकाधिक दिवसांपर्यंत चालावे अशी आमचीही भावना आहे.

मागील 25 वर्षांत नागपूरमध्ये सर्वाधिक काळ अधिवेशन हे मी मुख्यमंत्री असतानाच चालले. ते पुढेही चालेल. पण आता आचारसंहिता सुरू आहे. पुढे कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे पहिला आठवा व आणखी 2 दिवस एवढे अधिवेशन चालवण्याचे आपण निश्चित केले. आता अधिवेशनाचे उर्वरित दिवस पुढच्या वर्षीच्या अधिवेशनात समायोजित करून टाकू. पण मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. नाना पटोले यांचा अधिवेशनासाठी कितीही आग्रह धरला तरी ते अध्यक्ष असताना विधिमंडळाची मुंबईतील अधिवेशनेही 3 व 5 दिवसांची झाली होती. इतर राज्यांत अधिवेशने सुरुळीत सुरू होती. तिथे कोरोना नव्हता का? बाकी राज्यांत 15-20 दिवस अधिवेशने चालायची. पण महाराष्ट्रात केवळ 3-4 दिवस कामकाज चालायचे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *