66 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत 34 हा बहुमताचा आकडा जुळवताना प्रमुख राजकीय पक्षांच्या नाकीनऊ येत आहे. एक- एक नगरसेवक महत्त्वाचा ठरत असताना काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेने काँग्रेसला थेट इशारा दिला आहे.
जनविकास सेनेचे 3 नगरसेवक निवडून आले असून या संघटनेचे प्रमुख पप्पू देशमुख यांनी या निवडणुकीत 66 पैकी 42 नगरसेवक भाजप विरोधी मताचे निवडून आल्याचे सांगत यंदाची निवडणूक भाजपविरोधी होती हे काँग्रेस नेत्यांनी लक्षात घेण्याची भूमिका मांडली. त्यातच काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे जर भाजपचा महापौर झाला तर त्याच क्षणी आमची काँग्रेसशी असलेली आघाडी तोडू असे स्पष्ट केले.
आम्ही काँग्रेस सोबत राहण्याचा आणि शहराला स्वच्छ- पारदर्शक कारभार देण्याचा शब्द दिला आहे. मात्र तसे न झाल्यास भाजपशी ज्याप्रमाणे लढलो त्याचप्रमाणे काँग्रेसशी लढू असे म्हणत एक पाऊल पुढे टाकले आहे.
