गुंजाळा व कचराळा गावासाठी बंद असलेली ST बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी

विभाग नियंत्रकांना जगदीश लवाडिया यांचे निवेदन

कोंढा–घोडपेठ जिल्हा परिषद क्षेत्रातील गुंजाळा व कचराळा या गावांसाठी कोविडपूर्वी सुरू असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (ST) बस सेवा कोविडनंतर बंद करण्यात आली असून ती आजतागायत पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर सदर बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी जगदीश लवाडिया यांनी आज ST महामंडळाच्या विभाग नियंत्रक, चंद्रपूर यांना निवेदन दिले.

या बस सेवेचा उपयोग विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत होते. बस सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे आर्थिक खर्च वाढला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांचे उपचार व दैनंदिन प्रवास मोठ्या अडचणीत आला आहे.

यावेळी बोलताना जगदीश लवाडिया म्हणाले की,
“ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ST बस ही जीवनवाहिनी आहे. कोविडपूर्वी नियमित असलेली बस सेवा पुन्हा सुरू करणे ही लोकांची रास्त व गरजेची मागणी आहे. प्रशासनाने लोकहिताचा विचार करून तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा.”

सदर निवेदनाची दखल घेऊन ST महामंडळाने लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी, अन्यथा नागरिकांसह पुढील टप्प्यात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *