राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित ‘क्रीडा पर्व’मध्ये RCERTच्या विद्यार्थिनींची दमदार कामगिरी
चंद्रपूर : मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे ‘क्रीडा पर्व’ अंतर्गत रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर तसेच डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (DREMS), चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता सरदार पटेल महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शारीरिक सामर्थ्य, संघभावना, समन्वय, जिद्द आणि खेळाडूवृत्तीची कसोटी पाहणाऱ्या रस्सीखेच स्पर्धेत सरदार पटेल मेमोरियल सोसायटीच्या (ट्रस्ट) राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूरच्या अंडर-१९ महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
RCERTच्या विजेत्या संघात महक उईके (सिव्हिल), श्वेता एखारे (इलेक्ट्रिकल), आर्या पिंगे (इलेक्ट्रिकल), मैथिली आमटे (इलेक्ट्रिकल), दिव्यानी ताजणे (कॉम्प्युटर सायन्स), संचिता येलेटीवार (कॉम्प्युटर सायन्स), मीनल डाकरे (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन), श्रावणी वैरागडे (कॉम्प्युटर सायन्स), साक्षी बोकडे (इलेक्ट्रिकल) आणि वैष्णवी देशवेणी (कॉम्प्युटर सायन्स) यांचा समावेश होता.
स्पर्धेदरम्यान RCERTच्या विद्यार्थिनींनी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने प्रतिस्पर्धी संघाला आव्हान दिले. उत्कृष्ट समन्वय, आत्मविश्वास, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर त्यांनी अंडर-१९ महिला गटात प्रथम स्थान मिळविले. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे RCERTच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
मैदानावर निर्माण झालेल्या उत्साहपूर्ण वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना आणि सकारात्मक स्पर्धात्मक वृत्तीला चालना मिळाली. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच नियमित व्यायाम, क्रीडा सहभाग आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.
RCERTच्या विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे, प्रा. आदित्य आंबटकर, संचालक, शारीरिक शिक्षण, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
