
कलात: बलूचिस्तानच्या कलात जिल्ह्यात बुधवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका प्रवासी बसवर बेछुट गोळीबार केला. ज्यामध्ये किमान तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तपत्र डॉनच्या अहवालानुसार ही घटना नेमार्ग भागात घडली. बस कराचीहून क्वेटाकडे जात होती तेव्हा दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला.
बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले की या घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींना कलातच्या जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. मात्र एधी फाउंडेशनच्या बचाव अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले की जखमींची संख्या 10 वर पोहोचली आहे आणि अनेक जणांना उपचारासाठी क्वेटाच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
