रविवारी रात्री उशिरा सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात ४२ भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला. बहुतेक प्रवासी हैदराबादचे होते आणि उमराह करून परतत होते. बसमधील दोन स्थानिक सुविधा पुरवणाऱ्यांचाही मृत्यू झाला. मक्केहून मदिना येथे जाणारी बस रस्त्याच्या कडेला उभी असताना एका भरधाव इंधन टँकरने मागून धडक दिली. त्यानंतर स्फोट झाल्याने बसने पेट घेतला.
मदिनाहून सुमारे ४० किमीवरील मुहरास/मुफ्रीहाट परिसरात हा अपघात झाला. आग इतकी भीषण होती की प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. शोएब नावाचा फक्त एक भारतीय तरुण या अपघातातून वाचला. मृतांमध्ये एका कुटुंबातील १८ सदस्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. दरम्यान, जेद्दाह आणि रियाधमधील भारताचे मिशन स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहेत. हैदराबादचे पोलिस आयुक्त व्हीसी सज्जनार म्हणाले की, तेलंगणातून ९ नोव्हेंबर रोजी ५४ लोक जेद्दाह येथे पोहोचले होते. त्यापैकी ४३ जण बसने मदिना येथे प्रवास करत होते. याच काळात हा अपघात झाला. मृतदेह किंग फहद, मिकत आणि किंग सलमान रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मृतांमध्ये दहा मुलांचा समावेश आहे.
