सूरज चव्हाणच्या राजीनाम्यानंतर दादा आता कृषिमंत्र्यांना घरी पाठवणार? सुनील तटकरे यांचे सूचक वक्तव्य

शेतकऱ्यांच्याबद्दल सतत असंवेदनशील वक्तव्ये करणारे आणि कृषिखात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हणून संबोधणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जनतेचा रोष लक्षात घेता आणि प्रतिकात्मक आंदोलनांना तेवढेच गांभीर्याने घेणे गरजेचे असताना राष्ट्रवादी युवक अध्यक्षांनी थेट छावा संघटनेच्या आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण करून राज्यातील गुंडगिरी थांबणार नाही, याची पुरेपूर दखल घेतली. शेतकऱ्यांच्या पोरांना झालेली गंभीर मारहाण आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ राष्ट्रवादी युवक अध्यक्षांचा राजीनामा घेतला. मात्र केवळ त्यांचा राजीनामा घेऊन आम्ही शांत बसणार नाही तर शेतकऱ्यांच्याबद्दल सातत्याने असंवेदनशील बोलणाऱ्या आणि वागणाऱ्या कृषिमंत्र्यांनाही घरी पाठवा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्यामुळे पक्षात याविषयी गंभीर चर्चा सुरू असल्याचे कळते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यासंदर्भात अतिशय सूचक वक्तव्ये करीत अजित पवार याबद्दल अंतिम निर्णय घेतील, असे म्हटले.

लातूरमध्ये आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा अखेर राजीनामा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने सुरज चव्हाण यांचा राजीनामा झाल्याची असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. सुरज चव्हाण यांची हकालपट्टी करावी यासाठी राज्यभर छावा संघटनेने आज आंदोलन केले. त्यानंतर आज धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी सुनील तटकरे आज धाराशिवमध्ये आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *