चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी दोन कुख्यात दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून तब्बल ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर मोठा लगाम बसला आहे.
गोपाल जीवन मालाकार (३०, रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर), आशिष ऊर्फ जल्लाद अक्रम शेख (२२, रा. फुकटनगर, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. शहरातील विविध भागातून दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाल मालाकार व आशिष ऊर्फ जल्लाद शेख याला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
