चंद्रपूर-अहेरी महामार्गावरील गोंडपिपरी येथे संतप्त ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यामुळे संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग जाम केलाय. चंद्रपूर-अहेरी महामार्गावरील गोंडपिपरी येथे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या दिलाय.
गेल्या 8 दिवसात या भागात दोन ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. गणेशपिपरी येथे काल शेतात चारा कापत असताना अलका पेंदोर या 43 वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तर आठ दिवसांपूर्वी गणेशपिपरी जवळ असलेल्या चेकपिपरी गावात भाऊजी पाल हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात बळी पडला होता. आठ दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झालेत. वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी महामार्गावर गेल्या दोन तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
