गडचिरोली पोलीस दलाने सुरू केले 73 वे सार्वजनिक वाचनालय, “एक गाव, एक वाचनालय” उपक्रमाअंतर्गत सुरू केले वाचनालय

गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागात “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आलाय. या उपक्रमांतर्गत एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी या अतिदुर्गम गावात 73 व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते वरिष्ठ अधिकारी व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मौजा वांगेतुरी येथे सर्व सुविधांनी सुसज्ज अशा सार्वजनिक वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ चे अधिकारी व अंमलदार तसेच वांगेतुरी परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने श्रमदानातून व लोकवर्गणीतून मौजा वांगेतुरी येथे सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. यानिमित्ताने सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. गावातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांनी पारंपारिक वेशभूषा करून व पारंपारिक वाद्य वाजवून उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या वाचनालयामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी व नागरिकांना फायदा होत स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. 2023 पासून सुरु करण्यात आलेल्या एक गाव एक वाचनालय उपक्रमाच्या माध्यंमातून यापुर्वी स्थापन करण्यात आलेल्या 72 वाचनालयांचा लाभ अतिदुर्गम भागातील 8500 पेक्षा जास्त युवक-युवती व नागरिकांना होत असून या माध्यमातून एकूण 205 विद्यार्थी शासनाच्या विविध विभांगामध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *