न्याय वैद्यकीय सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन ठरणार उपयुक्त
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 कायद्यानुसार 7 किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक/न्याय वैद्यकीय पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग म्हणून राज्य शासनाच्या धोरणानूसार ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता गडचिरोली जिल्ह्रासाठी करण्यात आली आहे.
जिल्ह्रातील गुन्हे तपास यंत्रणेला तांत्रिक बळकटी देण्यासाठी तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध गुन्ह्रांवर अंकुश घालण्यासाठी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे’ लोकार्पण करण्यात आले. नजीकच्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्रातील प्रत्येक उपविभागासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या अत्याधुनिक व्हॅनमुळे गुन्हे तपासणी अधिक जलद, अचूक आणि प्रभावी होणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक फॉरेन्सिक उपकरणे बसविण्यात आली असून, गुन्ह्याच्या ठिकाणीच प्राथमिक पुरावे संकलित करणे, विश्लेषण करणे आणि त्वरित अहवाल तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत वेळेची बचत होऊन वैज्ञानिक तपासात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता येणार आहे. तसेच ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन अप्लिकेशन यांचा समावेश आहे.
यामध्ये डिजिटल फॉरेन्सिक, डीएनए सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि क्राईम सीन मॅपिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. विशेषतः सायबर गुन्हे, हत्या, अपघात आणि अन्य गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ही व्हॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
