चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यात शेतकऱ्यांचा तहसीलदारांविरोधात रोष

पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी व सातबारा बंद करू नये , शेतकरी संघटना ॲड. दीपक चटप यांची मागणी

चंद्रपुर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने एड. दीपक चटप यांच्यासह तालुका कार्यालयात धडक दिली. जिवती तालुक्यातील सातबारा अभिलेख शासनाने ऑनलाईन केलेला नाही.

शासनाकडे तालुक्यातील दस्त अद्यावत नसताना कागदपत्रांच्या त्रुटी असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे सातबारा रद्द करण्याचे आदेश देण्यास तहसीलदारांनी सुरूवात केली आहे. ऐन संकटात हे आदेश निघत असल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित होतील. त्यामुळे शेतकऱ्यांत रोष आहे. एकंदरीत जिल्ह्यात ६ पैकी ५ सत्ताधारी आमदार नसताना शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम होताना दिसणे दुर्दैवी असून प्रशासन देखील शेतकऱ्यांसोबत असंवेदनशीलपणे वागत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बांधावर सरसकट पंचनामे झाले नाही ही आपबीती तहसीलदार यांच्यासमोर मांडली. यावर तहसीलदार यांनी तालुक्यात शेतकऱ्यांचे ओला दुष्काळाने सरसकट नुकसान झालेच नाही असे असंवेदनशील वक्तव्य केले. संपुर्ण शेतांचे पंचनामे करण्याआधीच नुकसान न झाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला. जिवती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतजमीन धोक्यात आली आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना अद्याप पंचनामे न होणे, नुकसान मदतीपासून वंचित ठेवणे आणि सातबारा बंद करणे हे असंवेदनशील प्रकार थांबले पाहिजे; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *