८ हजार ६२१ हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान
जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील ८ हजार ६२१ हेक्टर क्षेत्रातील पीक उद्ध्वस्त झाले होते. शासनाने तीन महिन्यांनंतर ७ कोटी ३३ लाखांची नुकसान भरपाई मंजूर केली. भरपाईचा लाभ १३ हजार ७४२ शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
८ हजार २१ शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसला. चंद्रपूर जिल्हा हा उष्ण तापमानासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र २०२५ च्या जून, जुलै व ऑगस्ट कालावधीतच अवकाळी पावसाने हजेरी लावली तर जुलै महिन्यातही तीच परिस्थिती कायम होती. ऑगस्ट महिन्यातही याची तीव्रता वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची पेरणी करण्यास सुरुवात करतो. मात्र, याच महिन्यात अतिवृष्टीने तडाखा दिला. याचा सर्वाधिक फटका वरोरा, भद्रावती, राजुरा, जिवती कोरपना, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्याला बसला. यातील बरेच शेतकरी धान, सोयाबीन व कपाशीची शेती करतात. शासनाने भरपाई दिल्यास हंगामासाठी उपयोगी होईल, याकडे डोळे लावून बसले होते.
