15 ऑगस्ट ला मुद्रित केलेले पत्र उशिराने प्रकाशित करत असल्याची आहे तळटीप
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधी करत शांती वार्ता सुरू करण्याचे पत्र जारी केले आहे. 15 ऑगस्ट ला मुद्रित केलेले हे पत्र उशिराने प्रकाशित करत असल्याची तळटीप पत्रात लाल रंगाने छापण्यात आली आहे. भाकपा माओवादी केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याच्या नावाने हे पत्र जारी करण्यात आले आहे. पुढील एक महिन्यात तातडीची शस्त्रसंधी करून सर्व नक्षल शोध अभियाने बंद करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे.
देशाच्या प्रगतीत व धोरणात भाग घेण्याची भाषा नक्षल संघटनांनी केली आहे. नक्षलवाद्यांनी या पत्रात आम्ही मार्च 2025 मध्येच शांतीवार्तीचा प्रस्ताव ठेवला होता व 10 मे रोजी याबाबत पहिले पत्र जारी केले होते असे म्हटले आहे. मात्र त्यानंतरही सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले. त्यातच 21 मे रोजी शीर्ष नेता बसवराजू चा मृत्यू झाल्याचा उल्लेख पत्रात आहे. आम्ही शस्त्र सोडण्यास तयार आहोत अशी स्पष्ट भूमिका नव्या पत्रात आहे. केंद्र सरकारने गृहमंत्री, त्यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी अथवा प्रतिनिधी मंडळाशी शांतीवार्तेसाठी तयार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष प्रस्ताव दिल्यानंतर आम्हाला आमच्या दूरवर पसरलेल्या नक्षल कॅडरशी हा प्रस्ताव चर्चा चर्चा करण्यासाठी एक महिना द्यावा असेही नक्षल संघटनांनी म्हटले आहे. याशिवाय पहिल्यांदा व्हिडिओ कॉल द्वारेही आपण आमच्याशी बोलू शकता असेही आश्चर्यकारकरीत्या सांगण्यात आले आहे. आकाशवाणी व दूरदर्शन द्वारे आमची ही भूमिका प्रसारित करण्याची विनंती देखील नक्षल संघटनांनी केली असून त्यासाठी प्रथमच ईमेल देखील देण्यात आलाय. याशिवाय फेसबुक आयडी देखील जारी करण्यात आली आहे. देशभर सातत्याने नक्षलविरोधात मोठे अभियान छेडत नक्षल चळवळ संपवून टाकण्याचा चंग केंद्र सरकारने बांधला असताना आता नव्या शांती प्रस्तावाचे नेमके काय होते याकडे नक्षल प्रभावित क्षेत्रातील नागरिक व देशाचे लक्ष लागले आहे.
