कोरपना – तालुक्यातील नारंडा येथे झालेल्या पतीच्या हत्येप्रकरणात पत्नीचा सहभाग असल्याचे उघड होत असून, कोरपना पोलिसांनी मंगळवार, दिनांक १८ रोजी कारवाई करत मृतकाची पत्नी साधना नितेश वाटेकर हिला त्यांच्या नारंडा येथील राहत्या घरातून अटक केली. या कारवाईनंतर प्रकरणातील आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे.
साधना हिचे परपुरुषाशी कथित प्रेमसंबंध होते. हे संबंध आड येत असल्यामुळे तिच्या प्रियकरांनीच पतीची हत्या केल्याचा संशय असून, पोलिस तपासात या संबंधाचा धागा अधिक स्पष्ट झाला आहे. या हत्येप्रकरणात यापूर्वी आरोपी बादल सोनी व तुषार येनगटीवार रा. गडचांदूर या दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पत्नी साधना नितेश वाटेकर हिला अटक केल्यानंतर बादल सोनी व तुषार येनगटीवार यांच्यासह मंगळवारी कोरपना येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी ( पी सी आर ) सुनावली आहे. पुढील तपास दरम्यान हत्येचे नेमके कारण, कटकारस्थानाची पद्धत आणि आणखी कोणी आरोपी आहे का याबाबत तपास सुरू आहे. या थरारक घटनेमुळे नारंडा परिसरात एकच खळबळ उडाली असून, पतीच्या हत्येत पत्नीचा सहभाग असल्याची बाब ग्रामस्थांत चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत पोलिस निरीक्षक लता वाडीये यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देवानंद केकन , प्रकाश राठोड व कोरपना पोलिसांकडून पुढील तपास जलद गतीने सुरू आहे.
