चंद्रपूरचे आराध्य दैवत म्हणजेच देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे. या निमित्त चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक चंद्रपुरात दाखल झाले आहेत. अश्विन नवरात्राच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलुन गेला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली. महाकाली देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी मातेचा अभिषेक, शेंदूर, महावस्त्र आणि अलंकरण करून महापूजेनंतर महाआरती करण्यात आली. चौदाव्या शतकात गोंड राणी “हिरातनी” आणि त्यानंतर राणी ‘हिराई’ ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यातील भाविक गर्दी करतात. पुढचे ९ दिवस देवीच्या दर्शनाला लाखो भक्त हजेरी लावणार आहे.
