खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूचनेनंतर रेल्वे आणि नगर परिषद प्रशासनाकडून संयुक्त पाहणी

गोल पुलियामधून होणाऱ्या वाहतुकीची समस्या लवकरच सोडवली जाईल

चंद्रपूर : नागपूर-काझीपेठ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या कामामुळे बल्लारपूर शहरातील बस्ती येथील ‘गोल पुलिया’चा विस्तार करण्यात आला होता. मात्र, या बांधकामामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक नागरिकांना व वाहनधारकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने स्थानिक खासदार प्रतिभा धानोरकर यांना परिस्थितीची माहिती देत प्रत्यक्ष भेटीची विनंती केली होती. त्यानुसार २८ सप्टेंबर रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गोल पुलिया परिसराला भेट देऊन पाहणी केली आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून हा प्रश्न तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूचनेची तातडीने दखल घेत मंगळवारी दुपारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे एक विशेष पथक आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोल पुलिया परिसरात संयुक्त पाहणी केली. या पाहणी दरम्यान रेल्वेचे कार्यकारी अभियंता दिलीप सेलूकर, उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य, बांधकाम सभापती अब्दुल करीम शेख, पाणीपुरवठा सभापती इस्माईल ढकवाला, ज्येष्ठ नगरसेवक भास्कर माकोडे, बांधकाम विभागाचे मयूर दहीकर, कृष्णा गुलहाने, प्रणय वाटेकर, कंत्राटदाराचे प्रतिनिधी संदीप चौहान आणि खासदार प्रतिनिधी शेगावकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

पाहणीदरम्यान रेल्वे व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. तसेच या समस्येवर तांत्रिक व प्रशासकीय बाबी तपासून कामाला सुरवात केली.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व दिलेल्या निर्देशांमुळे रेल्वे प्रशासन आणि नगर परिषदेने तात्काळ सकारात्मक पावले उचलल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खासदार महोदयांच्या पुढाकारामुळे गोल पुलिया परिसरातील वाहतुकीची आणि रस्त्याची अडचण लवकरच दूर होणार असल्याचे संकेत मिळाल्याने बल्लारपूरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *