विजाभज आश्रम शाळा शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात बैठक

मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनांचे निर्देश

चंद्रपूर : इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री ना. अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालय मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. या बैठकीत आश्रम शाळा कर्मचारी व शिक्षकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी विविध प्रश्नांवर मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

बैठकीत आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, ऑलिम्पियाड, शिष्यवृत्ती परीक्षा यांसह विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना मंत्री महोदयांनी केल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस आमदार सुधाकर अडबाले, सचिव आप्पासाहेब धुळाज, संचालक सोनाली मुळे, सर्व प्रादेशिक उपसंचालक तसेच विभागातील प्रमुख अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे, सरचिटणीस किशन पुंड, तुकाराम शिरसाठ सर, केंद्रे सर, मुनेश्वर सर, रुपेश पाटील सर, सानप सर यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर आमदार सुधाकर अडबाले यांच्या कार्याचा आढावा घेणारे “सुधाकरपर्व” पुस्‍तक आमदार अडबाले यांनी मंत्री अतुलजी सावे यांना भेट दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *