चंद्रपूर तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात

 11 पथक प्रमुखांच्या नियंत्रणात संयुक्त पथकांकडून सर्वेक्षण
 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे

चंद्रपूर, दि. 30 : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये चंद्रपूर तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. चंद्रपूर तालुक्यात खरीप हंगामात सुमारे 17 हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली असून, या क्षेत्रातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत.

याच अनुषंगाने वलनी येथील शेतकरी संतोष आत्राम यांच्या शेतामधील नुकसानग्रस्त धान पिकाची पाहणी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, मंडळ अधिकारी विशाल कुरेवार, तलाठी रमेश झिटे, पोलिस पाटील अशोक मेश्राम पोलीस पाटील, ई-पीक पाहणी सर्व्हेअर विशाल गेडाम यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सुखदेव पेंदराम, वनपाल गेडाम, रोहित पेंद्राम हे शेतकरी सुध्दा उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद व्हावी, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये आणि शासनाला अचूक माहिती उपलब्ध व्हावी, या दृष्टीने महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या समन्वयातून ही कार्यवाही राबविण्यात येत आहे. शेतपिकांचे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत संयुक्तरीत्या करण्यात येत आहेत. संबंधित पथक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

11 पथक प्रमुखांकडून कामावर नियंत्रण : पंचनाम्याचे काम नियोजनबद्ध व गतीने पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर तालुक्यात एकूण 11 पथक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळ अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली संबंधित गावांमध्ये संयुक्त पथकांमार्फत शेतपिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनाम्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, प्रत्यक्ष नुकसानाची योग्य नोंद व्हावी तसेच पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूकपणे संकलित व्हावी, यासाठी पंचनामे करताना संबंधित शेतकऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान पिकांची सद्यस्थिती व नुकसान याबाबत आवश्यक माहिती नोंदविण्यात येईल.

पंचनाम्यांच्या याद्या चावडीवर प्रसिद्ध होणार : संयुक्त पथकांमार्फत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या याद्या संबंधित गावाच्या चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यामध्ये आपल्या नुकसानीची नोंद झाली आहे किंवा नाही, याची माहिती ग्रामस्तरावरच उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *