चंद्रपूर जिल्ह्यात मतदार यादी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचे निलंबन

मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शहरालगत घुगुस जवळच्या नकोडा येथील सरस्वती विद्या मंदिरचे सहायक शिक्षक आदर्श उत्तम दुधगवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मतदारयादीत नियमानुसार नोंदी समाविष्ट करणे अथवा वगळणे या संदर्भातील अधिकृत कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी हयगय, टाळाटाळ व निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून दुधगवळी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय निश्चित करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना देण्यात आले असून पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *