हृदयरोगग्रस्त १४० बालकांची मोफत 2डी इको तपासणी

३७ बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र

जिल्हा रुग्णालयात विशेष शिबिर

चंद्रपूर, दि. ३० : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) आणि जिल्हा अतिशीघ्र निदान केंद्र (DEIC), चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील हृदयरोगग्रस्त बालकांसाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे विशेष मोफत 2डी इको तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण १४० बालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३७ बालके शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियापूर्व तपासणीसाठी पात्र आढळून आली.

बालकांमधील जन्मजात दोष व आजारांचे लवकर निदान करून त्यांना आवश्यक उपचार, संदर्भ सेवा, शस्त्रक्रिया आणि नियमित फॉलोअप सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विविध विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. त्याचाच भाग म्हणून हृदयरोग असलेल्या बालकांसाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

५५ बालके नियमित फॉलोअपवर
शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या १४० बालकांपैकी ३७ बालके शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियापूर्व तपासणीसाठी पात्र ठरली. ५५ बालकांना पुढील वैद्यकीय निरीक्षण व नियमित फॉलोअपसाठी ठेवण्यात आले, तर ४८ बालकांचे 2डी इको अहवाल सामान्य आढळून आले. आवश्यकतेनुसार बालकांना औषधोपचार, पुढील तपासणी, उपचार व शस्त्रक्रियेबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या हस्ते झाले. मुंबई येथील किंम्स हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एल. श्रीनिवास व डॉ. सोनिया करापूरकर तसेच त्यांच्या वैद्यकीय पथकाने बालकांची सखोल तपासणी केली. तपासणीनंतर हृदयरोगाचे स्वरूप, पुढील उपचारांची आवश्यकता तसेच शस्त्रक्रियेबाबत पालकांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

लवकर निदानामुळे वेळेत उपचार शक्य
बालकांमध्ये आढळणाऱ्या जन्मजात हृदयरोगासह विविध आजारांचे वेळेत निदान झाल्यास आवश्यक उपचार आणि संदर्भ सेवा लवकर उपलब्ध करून देता येतात. त्यामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत नियमित आरोग्य तपासणीसोबत आवश्यकतेनुसार तज्ज्ञ वैद्यकीय तपासणी व विशेष शिबिरांवर भर देण्यात येत आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मजात दोष, बालपणीचे आजार, जीवनसत्त्वे व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता तसेच विकासात्मक विलंब यांचे लवकर निदान केले जाते. निदान झालेल्या बालकांना औषधोपचार, तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा, आवश्यक शस्त्रक्रिया आणि नियमित फॉलोअप सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

या विशेष शिबिरामुळे हृदयरोगग्रस्त बालकांना जिल्ह्यातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीची सुविधा मिळाली. विशेषतः शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची वेळेत ओळख झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी योग्य संदर्भ व मार्गदर्शन करणे सुलभ झाले. जिल्ह्यातील बालकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *