अमृता फडणवीस यांच्या हस्ते १०० विद्यार्थिनींना सायकल वाटप

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून गजानन निवासस्थानी उपक्रम

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी चंद्रपूर दौर्यावर आलेल्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०० शाळकरी विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने गजानन निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेत जाणार्या विद्यार्थिनींचा प्रवास सुलभ व्हावा आणि आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने सायकल वाटपाचा हा उपक्रम राबविण्यात आला. अमृता फडणवीस यांच्या हस्ते सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहर्यावर आनंद पाहायला मिळाला.
यावेळी अमृता फडणवीस यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मुलींनी शिक्षणाला प्राधान्य देत आत्मविश्वासाने पुढे जावे आणि आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, “चंद्रपूरच्या मुलींमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. मात्र अनेक विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ व्हावा आणि शिक्षणाची वाट अधिक सोपी व्हावी, यासाठी सायकल वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. मुली शिकल्या तर कुटुंब आणि समाजाची प्रगती निश्चित होते. त्यामुळे चंद्रपूरमधील प्रत्येक मुलीला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थीनी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *