चंद्रपूर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज अपघाती निधन झाल्याची बातमी कळली. अत्यंत दुःखद आणि अविश्वसनीय अशी ही घटना आहे. एैन उमेदीच्या काळामध्ये झालेला हा अपघाती मृत्यु हळहळ व्यक्त करणारा आहे. यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे. हे खर आहे की, राजकीय मंचावरचा एक मोठा जनाधार असणारा हा नेता होता. कुशल संघटक, उत्तम प्रशासक म्हणून ख्याती प्राप्त अजितदादांनी अनेक वर्ष राजकारणात कार्य करतांना असंख्य माणसे जोडली आणि ती टिकवून ठेवली. आजही त्यांच्या नावाने असंख्य कार्यकर्ते एकत्रित यायचे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. राजकारणातला अशा शक्तीशाली नेता आज महाराष्ट्राने गमावला आहे. यावेळेस ते सत्तेतही होते. त्यांच्या सारखा राजकारण व सत्तेमधला अनुभवी नेता एकाएकी निघून जाणे ही महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे, आज महाराष्ट्राला त्यांची गरज होती.
त्यांच्या सारखे सुजान नेतृत्व, विशेष म्हणजे कार्यकर्त्यांवरही त्यांचे अफाट प्रेम व तितकाच विश्वास ठेवणारा हा नेता होता. प्रशासकीय क्षेत्रामध्ये प्रभाव व दबाव होता. हजरजवाबी नेतृत्वाचे ते धनी होते. भाजपासोबत सत्तेमध्ये त्यांची मैत्री होती, त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये अपार आदर होता. ते जेव्हा भेटले तेव्हा अनेक प्रसंगावर फार चांगले बोलायचे. दादा असे नेतृत्व होते, जे शरद पवारजींच्या कुटूंबातून आल्याने त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे बाळकडु मिळाले होते. या अनुभवाचा त्यांनी पुर्ण लाभ जनतेला दिला, पक्षाला दिला आणि विचारांना सुध्दा दिला.
असा नेता होणे कठीण असते. इतके अनुभवी आणि बालपणापासून राजकीय संस्कार घेवून तयार झालेला व महाराष्ट्राचे कल्याणच करणारा हा नेता होता असा विश्वास मला आहे. ते आपल्यातून गेले याचे कार्यकर्त्यांना, कुटूंबियांना दुःख आहेच परंतु, महाराष्ट्राच्या तमाम जनतेला त्यांच्या अकाली जाण्याचे फार दुःख व हळहळ आहे. त्यांना अतिव दुःखाने मी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. या संकटामुळे त्यांच्या कुटूंबियांना झालेल्या दुःखात सहभागी होतांनाच हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो अशी प्रार्थना करतो.
